Tuesday, March 9, 2010

फोटोतल्या आठवणी

नमस्कार,

मी आपला मित्र.
आपल्या कॉलेज जीवनातील ह्या सर्व आठवणी लक्ष्यात राहण्यासाठी (छायाचित्र) फोटो हे एक उत्तम माध्यम आहे. फोटो हे नेहमीसाठी आपल्याजवळ आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण म्हणुन राहतात. आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणिंबरोवर घालवलेले क्षण, आपल्याजवळ दृश्य स्वरुपात राहण्यासाठी फोटो हे एक उत्तम माध्यम आहे. फोटो पाहत असताना हे फोटो आपल्याला नकळत त्या आठवणींत, त्या काळात, त्या सिच्युएशनला, त्या समारोहाची आठवण करुन देतात. अशा आठवणी आल्या की, त्या वेळी घडलेल्या चांगल्या वाईट आठवणी, त्या वेळचा प्रसंग, त्या वेळची मैत्री, तेथे आपल्या मित्र-मैत्रिणींशी उडालेले खटके, एखाद्याशी झालेली मैत्री, या सर्व आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या कार्यक्रमाला एखाद्याची झालेली फजीती आपल्याला न कळत हसवुन जाते. एखाद्याशी झालेले भांडण आणि त्यावेळी आपण कसे वागलो हे सर्व आठवते व त्या वेळी आपण चुकीचे वागलो असे मग आज आपल्याला वाटण्यास हे फोटो भाग पाडतात.
फोटो हे एक फार प्रभावी माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये फोटोला नकळत एक फार महत्त्वाचे स्थान आहे. मुलगा जन्मला की, त्याच्या बारसे पासुन या फोटोचा प्रवास सुरु होतो. मग नंतर वाढदिवस, समारंभ, छोट-छोट उत्सव, असा या फोटोचा प्रवास चालू असतो. पुढे मग दहावीला सुरु होतो तो पासपोर्ट फोटोचा पाठलाग. मग हा पाठलाग कॉलेज, नोकरी, मतदान अश्या प्रकारे चालुच राहतो. मग पुढे आपल्या आयुष्याच्या एकदम महत्त्वाच्या टप्प्यावर या फोटोचे महत्त्व फारच वाढते. मग मॉडेलिंगचे फोटो, दुस-यांना दाखवण्यासाठीचे फोटो, आपल्या मित्र-मैत्रिंणींसोबतचे फोटो, त्याच्या/तिच्या सोबतचा आपला फोटो या सर्वांना एकदम वेगळेच स्थान निर्माण होते. त्याच्या/तिच्या सोबतचा आपला फोटो तोही चांगला निघावा यासाठी चाललेली त्यांची धडपड, फोटो काढुन झाल्यावर तो कसा निघतो या बाबतची लागलेली चिंता व उत्सुकता ही काही औरच असते. फोटो चांगला आल्यावर तो आपल्या मित्र-मैत्रिंणींना दाखवणे, पुस्तकाच्या पानात तो फोटो ठेऊन तासन्-तास तो निहाळणे आणि आई-बाबांना वाटावं की आपला मुलगा/मुलगी फार अभ्यासु आहे. तो फोटो घरात ठेवल्यानंतर तो कोणी पाहणार तर नाही ना म्हणुन येणारं टेन्शन हे फार मजेशीर असतं. त्याच्या अथवा तिच्या पाकिटात पैसे असणे ही गोष्ट महत्त्वाची न राहता एकमेकांचा फोटो असणे हे फार महत्त्वाचे बनते. या नंतर लग्नासाठी दाखवणा-या फोटोंची बारी येते. या वेळेस फोटोचे महत्त्व फारचं वाढते. हे फोटोच त्यांची लग्न ठरवण्याची प्रथम पायरी ठरतात. मग आयुष्याचा प्रवास सुरु होतो फोटोच्या सहाय्याने. मग लग्नाचे फोटो, मुलाच्या बारश्याचे फोटो, त्याच्या जावळाचे फोटो, मग कुटुंबात झालेल्या उत्सवाचे, समारोहाचे फोटो मग शेवटी एक फोटो शेवटचा तो म्हणजे .........
अशा प्रकारचा हा फोटोचा प्रवास आपल्या आयुष्याच्या सुरुवाती पासुन शेवट पर्यंत चालू राहतो. मग आपण गेल्यावर राहतात त्या फक्त आठवणी. फोटो पहाताना येणा-या आठवणी. फोटोतल्या आठवणी.

- राहुल कि. रणसुभे
(छायाचित्रकार)
३१ सप्टेंबर २००७
९.५० रात्री.

1 comment:

Unknown said...

hi
how r u
ur collection is good. i am also impressed yrr